छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): कार्तिक एकादशीनिमित्त वाळूज महानगरातील प्रतिपंढरपूर येथे भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण मंदिर भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाले. यावेळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला असा जयघोष करण्यात आला.
पंढरपूरच्या वारीनंतर कार्तिक एकादशीला महाराष्ट्रात मोठे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे वाळूज येथील या मंदिरात देखील ही यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या यात्रेमुळे केवळ भाविकांना विठुरायाचे दर्शन घडते असे नव्हे तर परिसरातील व्यावसायिकांनाही यानिमित्ताने मोठा आर्थिक आधार मिळतो. आजच्या या विक्रमी गर्दीमुळे वाळूज पंढरपूर येथील कार्तिक एकादशीचा सोहळा उत्सवाचा आणि भक्तीचा महासोहळा म्हणून संस्मरणीय ठरला. कार्तिक एकादशीनिमित्त आज प्रति पंढरपूर गजबजले असून मंदिरा जवळ अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. कार्तिक एकादशी उत्सवात हजारो भाविक सहभागी झाले आहे. दिवसभरात किमान एक लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज मंदिराच्या वतीने विश्वत मंडळींनी वर्तविला आहे. त्यासाठी तशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
भाविकांना सुरळीत दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या वतीने व्यवस्था केली आहे. यात्रा देखील भरविली गेली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीस आज सकाळी आ. विलास बापू भुमरे यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक व महापूजा करण्यात आली. पायदळ दिंड्याचे आगमन झाले. तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव अप्पासाहेब झळके, कोषाध्यक्ष रत्नाकर शिंदे, हरिष साबळे, कृष्णा झळके, हरिभाऊ शेळके, बंकटलाल जैस्वाल सह आदीं विश्वस्त मंडळाच्या वतीने सहकार्य करण्यात आले. आज सकाळपासून मोठ्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी देखील आपले सहकार्य केले. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री शिवमहापुराण कथा तसेच कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्ताने प्रवचन आयोजित केले आहे. तर उद्या सोमवारी (दि.3) ह.भ.प. कैलासगिरीजी महाराज सकाळी 9 ते 11 या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.
भाविकांची विक्रिमी गर्दी
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज (दिनांक) कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्त भक्तांचा अक्षरशः महासागर उसळला. मराठवाडा आणि आसपासच्या विभागातून आलेल्या सुमारे लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली, ज्यामुळे मंदिर परिसर आणि शहराला वारीचे स्वरूप प्राप्त झाले. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल च्या नामघोषाने संपूर्ण वाळूज परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.